Ad will apear here
Next
डासांना प्रतिबंध करणारे कपडे; कर्नाटकातील मुलीचे नावीन्यपूर्ण, किफायतशीर संशोधन
राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर सुनीता प्रभू

डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या वेळी होत असतो. डासांमुळे होणाऱ्या या आजारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय सापडणे गरजेचे आहे. डास मारण्याचा दावा करणाऱ्या कॉइल्स, रिपेलंट क्रीम, तसेच इतर बऱ्याच वस्तू मिळतात; पण त्यांचा प्रभाव मर्यादित असतो. म्हणूनच कर्नाटकातील सोळा वर्षांच्या सुनीता प्रभूने यावर एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. त्याबद्दल तिचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कारही झाला आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या काळात भारतात ६७ हजार ३७७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची बाब एका अहवालातून समोर आली आहे. यापैकी १२ हजार ७५६ रुग्ण एकट्या कर्नाटक राज्यात होते. डासांना दूर ठेवणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती आपण टीव्हीवर बघतो; पण डेंग्यूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असणाऱ्या भागांमध्ये हे उपाय पुरेसे ठरत नाहीत. मच्छरदाण्याही पुरेशा होत नाहीत. याच कारणामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या अत्यंत घातक आजारांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बेलथांगडी (मेंगळुरू) येथील १६ वर्षीय सुनीता प्रभूने डासांच्या समस्येवर अनोखा उपाय शोधून काढला आहे. तिचे हे संशोधन खूप उपयुक्त ठरू शकते. या संशोधनामुळे तुमचे कपडेच डासांना प्रतिबंध करू लागतात. याचे निर्मितीमूल्य अवघे १४ रुपये आहे. या उपयुक्त संशोधनासाठी सुनीताला यंदाच्या बालशक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सुनीता ही उद्योजक विवेकानंद प्रभू आणि शंथाला प्रभू यांची मुलगी. एसडीएम इंग्लिश मीडियम स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. सध्या ती मंगळुरूतील सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स लर्निंगमध्ये शिक्षण घेत आहे.  सुनीताला लहानपणापासूनच विज्ञानात प्रचंड रस होता. विज्ञानातील चमत्कारांनी तिला नेहमीच आकर्षित केले. आंतरशालेय आणि आंतरराज्य विज्ञान प्रदर्शनांमध्ये, तसेच जत्रांमध्ये ती सहभागी झाली. विविध समस्यांचे निवारण करण्याची क्षमता विज्ञानात आहे, हे जाणून सुनीता सतत संशोधन करत असते.

नववीत असताना सुनीताने डेंग्यू, मलेरियाच्या वाढत्या प्रभावाबद्दल वाचले होते. डासांमुळे होणाऱ्या आजारांची तीव्रता तिच्या लक्षात आली. यावर काही तरी उपाय करण्याचा विचार तिच्या मनात डोकावला. तिने याबाबत बरेच संशोधन केले. डासांना प्रतिबंध करणारे उत्पादन प्रभावी असण्यासोबतच किफायतशीर असणेही गरजेचे होते. मग तिने संजीव होथा या पुण्याच्या मित्रासोबत यावर काम करायला सुरुवात केली. एका विज्ञान प्रदर्शनात या दोघांची ओळख झाली होती.

या दोघांनी तयार केलेले हे उत्पादन कपड्यांवर लावता येते. यामुळे डासांना प्रतिबंध करणे शक्य होते. कपड्यांवर डायने प्रिंट केलेले नाव कपडे अनेकदा धुवूनही निघून जात नाही. याच तंत्राचा वापर या जोडगोळीने या संशोधनासाठी केला आहे. त्यांनी तयार केलेल्या रसायनाचा कपड्यांशी संयोग झाल्यावर त्या कपड्यांमध्ये डासांना प्रतिबंध करण्याची क्षमता निर्माण होते. कपडे अनेकदा धुतल्यानंतरही त्या क्षमतेवर परिणाम होत नाही. ही प्रक्रिया केलेले कॉटनचे कपडे ४० वेळा धुतले, तरी त्यांच्यातील डासप्रतिबंधाची क्षमता कमी होत नाही, असे संशोधनातून त्यांनी सिद्ध केले. पुण्यातील आयसर आणि एनसीएल या नामवंत संशोधन संस्थांमध्ये या संशोधनाची वैधता तपासण्यात आली.

मे २०१९मध्ये हे दोघे इंटरनॅशनल सायन्स अँड इंजीनिअरिंग फेअरमध्येही सहभागी झाले होते. त्यांचे हे संशोधन विविध ठिकाणी सादर करण्यात आले. हे उत्पादन तयार करण्यासाठी फक्त १४ रुपये खर्च येतो. समाजाच्या तळागाळातल्या नागरिकांच्या वस्तीत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे हे उत्पादन कमीत कमी खर्चात उपलब्ध होणे गरजेचे असल्याचा विचार सुनीताने केला. त्यामुळे हे उत्पादन अत्यंत कमी किमतीत तयार करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग कंपन्यांकडूनही या संशोधनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या संशोधनाचे पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सुनीताला संशोधन क्षेत्रातच करिअर करायचे आहे. सुनीतासारख्या युवा शास्त्रज्ञांची देशाला गरज आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VXFVCP
Similar Posts
७० लाखांचे पॅकेज नाकारून इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी सुरू करणारा जिगरबाज अली उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर सहसा कोणी नाकारत नाही; पण दिल्लीच्या मोहम्मद आमिर अली या जिगरबाज तरुणाने थोड्याथोडक्या नाही, तर ७० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आणि भारतात राहून देशासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने इलेक्ट्रिक वाहने बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली
पुण्यातील डॉ. रोहन कुलकर्णी यांना जागतिक पातळीवरील ‘स्टेम सेल्स तरुण संशोधक’ पुरस्कार पुणे : स्टेम सेल्स अर्थात मूळ पेशींवर संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना दिला जाणारा जागतिक पातळीवरील स्टेम सेल्स यंग इन्व्हेस्टिगेटर अॅवॉर्ड (तरुण संशोधक पुरस्कार) या वर्षी डॉ. रोहन कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
कल्पनेला पडद्यावर साकारणारे ‘इल्युजन इथेरिअल’ पुणे : चित्रपटाच्या कथेची मांडणी, सादरीकरण याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आज व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानालासुद्धा आले आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक या आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देत असल्याचे दिसते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या लाल कप्तान, हिरकणी, फत्तेशिकस्त या चित्रपटांच्या ‘व्हीएफएक्स’ची सर्वत्र मोठी चर्चा होती
‘No.. No... चेहऱ्याला हात लावू नका;’ करोना प्रतिबंधासाठी कम्प्युटर/लॅपटॉप देणार इशारा; तरुणाचे अॅप करोना विषाणूने सध्या जगभरात सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्यावर अद्याप औषध नसल्याने प्रतिबंधात्मक काळजीच कसोशीने घ्यायच्या सूचना अगदी जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) सगळ्याच महत्त्वाच्या संस्था देत आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्याचा एक उपाय म्हणून हात वारंवार धुवा आणि चेहऱ्याला सतत हात लावू नका, अशाही सूचना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language